महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या एसटी बसची रंजक कहाणी तुम्हाला माहीत नसेल तर जरूर वाचा

महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या एसटी बसची रंजक कहाणी
_तिला कुणी एसटी म्हणतं… कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बाही म्हणतं… कुणाला ती प्राणाहून प्रिय आहे तर कुणी तिचा तिरस्कारही करतं मात्र ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे हे कुणीही नाकारु शकत नाही.

आज महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जाऊन लोकांची ने आण करण्याचं काम एसटी करते. खेड्यापाड्यात आजही लोक एसटी वाट पाहात थांबलेली दिसतात कारण वाहतुकीसाठी त्यांना आधार आहे फक्त एसटीचाच…एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास… असा नारा सरकारने दिला किंवा तिला बहुजन हिताय, बहुजन सुखाय असंही म्हटलं गेलं मात्र आपल्याला तिचा खरा इतिहास माहीत आहे का? महाराष्ट्रातील पहिली एसटी केव्हा सुरु झाली? ती कोणत्या दोन शहरांमध्ये धावली? तेव्हा एसटीचं तिकीट नेमकं किती रुपये होतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पडला असेल किंवा नसेल पडला तरी आज आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलो आहोत.

१ जून १९४८ रोजी पहिल्यांदा धावली एसटी
महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता 1 जून 1948. आत्ता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं नाव असलं तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होतं. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असं एसटी महामंडळाचं नाव होतं. एसटी बस कुठल्या दोन शहरांमध्ये धावणार याची जशी तुम्हाला उत्सुकता होती तशी उत्सुकता त्यावेळच्या लोकांमध्येही होती. अहमदनगर आणि पुणे ही ती दोन भाग्यवान शहरं होती ज्यांच्या दरम्यान पहिली एसटी बस धावली होती. पहिली एसटी बस म्हणजे तिचा थाट विचारायला हवा का? किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता, तर लक्ष्मण केवटे नावाचे गृहस्थ वाहक होते.

कशी होती पहिली एसटी बस ?
जी बस पहिली एसटी बस म्हणून धावली तिची बॉ़डी आजच्यासारखी लोखंडी नव्हती किंवा आतमध्ये अॅल्युमिनिअमचं कामही नव्हतं. ती एक लाकडी बॉडी होती आणि वरुन जे छप्पर होतं ते चक्क कापडी होतं. लाकडी बॉडी असलेल्या या बसची आसनक्षमता 30 होती. सकाळी ठिक 8 वाजता ही बस अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसचं तिकीट होतं अडीच रुपये.

ठिकठिकाणी झाले जल्लोषात स्वागत
अहमदनगर ते पुणे प्रवासाच्या दरम्यान चास, सुपा, शिरुर, लोणीकंद अशी गावं लागली. लोक एसटी बस थांबवून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र आसनक्षमतेमुळे ते शक्य नव्हतं. ज्या गावांमधून पहिली एसटी जाणार होती त्या गावांमध्ये आजूबाजूच्या गावांमधील लोकांनी मोठी गर्दी केली होती. वाहनं तशी अभावानंच पहायला मिळणाऱ्या या दिवसांमध्ये लोकांना या गाडीचं अप्रूप वाटणं सहाजिक होतं. गावागावांमध्ये लोक बसचं जल्लोषात स्वागत करत. नवीन वाहनं आणल्यावर आज आपल्याकडे सवासिनी त्याची पुजा करतात किंवा आजही एखाद्या गावात एसटीची सेवा सुरु झाली तरी अशी पुजा केली जाते. तेव्हाही गावागावांमध्ये सवासिनी पुजेचं ताट घेऊन उभ्या होत्या. एसटी गावात पोहोचली की तिची पुजा केली जाई.

पोलीस बंदोबस्तात धावली पहिली एसटी बस
पुण्यामध्ये शिवाजीनगरजवळच्या कॉर्पोरेशनपाशी या बसचा शेवटचा थांबा होता, मात्र त्यावेळी पुण्यात अवैध वाहतूक जोरात होती. राज्य महामंडळाची बस सुरु झाल्याने या अवैध वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता होती त्यामुळे एसटीवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एसटीवर हल्ला होण्याची शक्यता राज्य सरकारने गांभीर्याने घेतली होती. त्यामुळे पुण्यात एसटीने प्रवेश केल्यापासून म्हणजेच माळीवाडा वेशीपासून ही बस पोलीस बंदोबस्तात कॉर्पोरेशनपर्यंत आणण्यात आली.

 

Comments

Popular posts from this blog

Top 10 Satta King Information - Comprehending the Dark Fact of Illegal Gaming

Just How To Play Satta King Online

WhatsApp to reward users with Rs 51 cashback for using payments feature